Latest Posts

तहसील कार्यालयात विष घेणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू

– मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): मोरवा येथील शेतकरी परमेश्वर ईश्वर मेश्राम (वय ५५) यांनी महसूल प्रशासनाच्या अन्यायाविरोधात तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ११ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी (दि. ६) पहाटे तीन वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांचे निधन झाले. या घटनेने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषी तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

न्यायालयाचा आदेश झुगारला, प्रशासनाची टाळाटाळ –
शेतकरी मेश्राम आणि त्यांच्या वारसांची नावे गाव नमुना ७ मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार नोंदविणे बंधनकारक होते. मात्र, महसूल प्रशासनाने मालकी हक्काबाबत वाद असल्याचे कारण देत आदेशाची अंमलबजावणी न करता प्रकरण प्रलंबित ठेवले. यामुळे मेश्राम मानसिक तणावात गेले आणि अखेर २६ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात विष प्राशन केले.

दोषी अधिकाऱ्यांवर फक्त निलंबन पुरेसे नाही –
या घटनेनंतर तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना निलंबित करण्यात आले असले तरी, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.- न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
– विठ्ठल बदखल, अध्यक्ष, शेतकरी संरक्षण समिती

पुरावे नष्ट केल्याचा आरोप –
विष प्राशनानंतर घटनास्थळी विषाची बाटली व उलट्या झाल्या असताना, तहसीलदारांनी कर्मचाऱ्यांमार्फत जागेची स्वच्छता करून पुरावे नष्ट केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर आणखी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

कारवाई प्रतीक्षेत, अहवालांची वाट –
विभागीय चौकशी झाली आहे. अद्याप अंतिम अहवाल प्राप्त झालेला नाही. वैद्यकीय शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल.

Latest Posts

Don't Miss