Latest Posts

शहरात खिसेकापू टोळी सक्रिय : क्षणात मोबाईल गायब

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur): शहरातील मध्यवर्ती नगर परिषद चौक परिसरात भरदिवसा काही क्षणांच्या दुर्लक्षाचा फायदा घेत दोन अज्ञात चोरट्यांनी एका नागरिकाचा महागडा मोबाईल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

माहितीनुसार, अशोक विठोबाजी धोडरे (वय ६०), रा. डोहेवाडी, ता. राजूरा हे शुक्रवारी १७ एप्रिल दुपारी २ वाजताच्या सुमारास चंद्रपूरकडे जात असताना बल्लारपूर येथील नगर परिषद चौकात थांबले होते. रस्त्याच्या कडेला लिंबू खरेदी करत असताना त्यांनी मोबाईल शर्टच्या वरच्या खिशात ठेवला होता. याच वेळी दोन संशयित इसम तेथे उपस्थित होते.

धोडरे लिंबू घेऊन परत कारमध्ये बसल्यानंतर मोबाईल गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने दुसऱ्या मोबाईलवरून कॉल करण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद असल्याचे दिसून आले. यावरून चोरट्यांनी नियोजनपूर्वक चोरी केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लिंबू विक्रेत्याच्या माहितीनुसार, संबंधित इसम मोटारसायकलवर आले होते व ऑनलाईन पेमेंट करून काही क्षणातच तेथून पसार झाले. चोरट्यांनी सुमारे ४० हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा व्ही-४० मोबाईल हातोहात लंपास केला.

या घटनेप्रकरणी बल्लारपूर पोलीसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विक्की लोखंडे तपास करत आहेत.

Latest Posts

Don't Miss