Latest Posts

कांदा पीक वाचले नाही : हताश शेतकऱ्याने फिरवला रोटाव्हेटर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृससंस्था / पुणे (Pune): करंदी (ता. शिरूर) येथील शेतकऱ्याने अतिवृष्टी व खराब हवामानामुळे पूर्णतः बाधित झालेल्या कांद्याच्या पिकावर नाईलाजाने ट्रॅक्टर फिरवून ते नष्ट केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दोन महिने राबून वाढवलेले हिरवेगार पीक डोळ्यांसमोर सडताना पाहण्याचा हा प्रसंग बळीराजावर मानसिक व आर्थिक आघात करणारा ठरला आहे.

यंदा हवामानात सातत्याने बदल झाल्याने कांद्याच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला. कधी ढगाळ वातावरण, कधी अचानक होणारा पाऊस यामुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली. त्यातच अतिवृष्टीमुळे जमिनीत पाणी साचून राहिल्याने कांद्याच्या मुळांना हवा मिळाली नाही. परिणामी, करपा, मावा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला.

कांद्याच्या पानांचा रंग पिवळा पडणे, मान कुजणे, वाढ खुंटणे यासारखी लक्षणे दिसू लागली. यामुळे संपूर्ण पीक अडचणीत आले. यावर कोणतेही रसायन प्रभावी ठरत नसल्याने, शेतकऱ्याने रोगट पीक नष्ट करून पुढील हंगामासाठी जमीन तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतातील पीक ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरखाली जाण्याचे दृश्य अंगावर येणारे ठरले.

या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये हताशा वाढली आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना, दुसरीकडे नैसर्गिक संकटांमुळे उत्पन्नाचा स्रोतच नष्ट होत आहे. शासनाने याची तातडीने दखल घेऊन, पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

Latest Posts

Don't Miss