Latest Posts

राजुरा-गडचांदूर मार्गावर भीषण अपघात : सहा ठार, दोन गंभीर जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Charndrapur) : राजुरा तालुक्यातील कापणगावजवळील राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाला रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ट्रक व प्रवासी ऑटोमध्ये झालेल्या जोरदार धडकेत ऑटोचा चक्काचूर झाला. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतांच्या नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजुराहून खामोना दिशेला प्रवासी घेऊन ऑटो क्रं एमएच ३४ डी ३९४१ जात असताना गडचांदूरकडून रस्ते कामासाठी येणारा ट्रक क्रं. आरजे १४ जेओ ९२२१ वेगात आला. कापणगावाजवळील ओव्हरब्रिजवर ट्रकने ऑटोला जबरदस्त धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ट्रक चालकाने ऑटोला जवळपास ३० ते ४० मीटरपर्यंत फरफटत नेले.

त्यामुळे ऑटोमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेत एकाचा मृत्यू झाले. वर्षा बंडू मांदाडे (४०), रवींद्र हरी बोबडे (५०), शंकर  पिपरे (५५), तारा पुप्पलवार (६०), प्रकाश मेश्राम (५५) असे मृतकाचे नाव असून तन्वी सुभाष पिंपळकर यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाले.

जखमी प्रवासी मध्ये निर्मला झाडे रा. भुरकुंडा, भोजराज कोडापे रा.भुरकुंडा यांचा समावेश आहे.

ऑटोमध्ये एकूण आठ प्रवासी होते. मृतांपैकी बहुतेक जण राजुरा व परिसरातील असून, त्यांच्या घरांवर शोककळा पसरली आहे.या मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, राजस्थान, गुजरातसह इतर बाहेरील राज्यातील ट्रक वाहतूक होत आहे.

यातील अनेक ट्रकांना विमा, पासिंग व कायदेशीर परवाने नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. अशा वाहनांवर कोणतीही कारवाई न करता कामकाज सुरू असल्याने प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.

अपघातानंतर शेकडो लोक घटनास्थळी जमले. महामार्ग बांधकाम कंपनी व प्रशासनाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. काही काळ वातावरण तंग झाले होते, मात्र पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनुचित प्रकार टळला.

या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, रस्ते बांधकाम कंपनीवर व प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Latest Posts

Don't Miss