विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : अजब गजब विचार मंच, गडचिरोली यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपावलीच्या पार्श्वभूमीवर संगीत महोत्सव – २०२५, पर्व १२ वे पहाट स्वरांच्या दिव्यांची हा अद्वितीय संगीत सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या संगीत महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी नेमके ६.३० वाजता दीपावली सांध्य मैफिलीने होणार आहे. तर शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ५.०० वाजता पहाट स्वरांची मैफल रंगणार आहे. आयोजकांनी कार्यक्रम नियोजित वेळेवरच प्रारंभ होणार असल्याची माहिती दिली आहे.
या दोन दिवसीय संगीत सोहळ्यात पुण्याची कैवल्य केजकर, अहिल्यानगरची सुरभी कुलकर्णी, मुंबईच्या भाग्यश्री टिकले आणि सागर म्हात्रे हे ख्यातनाम कलाकार आपले सुरेल सादरीकरण सादर करणार आहेत. त्यांच्यासोबत गडचिरोलीचे सतीश त्रिनगरीवार आपला कलाविष्कार सादर करतील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गलांडे करणार असून, या स्वरमयी सोहळ्याचे स्थळ विद्याभारती कन्या हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, मूल रोड, गडचिरोली हे आहे.
संगीतप्रेमींसाठी दीपावलीच्या आनंदात रंग भरून टाकणारी ही मैफल ठरणार असून, रसिकांनी नियोजित वेळेत उपस्थित राहून या स्वरयज्ञाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
