विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या विवादित शासकीय निर्णयामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली आहे. हा जीआर तत्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आज, शुक्रवार १० ऑक्टोबर रोजी नागपुरात भव्य ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात येत आहे.
दुपारी १२ वाजता यशवंत स्टेडियम येथून मोर्चा निघून संविधान चौकात जाहीर सभेत परिवर्तित होणार आहे. या मोर्चात विविध ओबीसी संघटनांसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असून नागपूर पोलिसांनीही कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
ओबीसींच्या हक्कावर आघात होणार नाही – विखे पाटील –
बुलढाणा येथे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले की,ओबीसींच्या आरक्षणावर कोणताही आघात होणार नाही. त्यांचा हक्क कायम राहील.
ते पुढे म्हणाले, मराठा समाजाने कधीच ओबीसी आरक्षणास विरोध केला नाही. मात्र, शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले नाही, त्यामुळे निर्माण झालेली दरी त्याकाळच्या सरकारकडून झाली.
आरक्षणाच्या प्रश्नावर तरुणाची आत्महत्या –
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात कोनोशी येथे वंजारी समाजातील अमोल दौंड (२०) या तरुणाने आत्महत्या केली. आमच्या जातीचे काही खरे नाही, मी स्वतःला संपवतो अशी चिठ्ठी घटनास्थळी आढळली.
थाटे-वाडगाव येथे वंजारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नऊ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. समाजाच्या आरक्षणाबाबत निराशा आणि असंतोषामुळे अमोलने हे टोकाचे पाऊल उचलल्याची नातेवाईकांची माहिती आहे. मृतकाचे आई-वडील ऊसतोडणी मजूर आहेत.
माळी महासंघ पदाधिकाऱ्याची आत्महत्या, स्टेटसवर व्यक्त केला आक्रोश –
अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील माळी महासंघाचे पदाधिकारी विजय बोचरे (५९) यांनी गुरुवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी त्यांनी मोबाईलवर स्टेटस ठेवून मुख्यमंत्री व शासनाला उद्देशून पत्र लिहिले.
त्यात त्यांनी लिहिले – ओबीसींना वाऱ्यावर सोडले आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. जातीय जनगणना झाली पाहिजे, नाहीतर ओबीसींचे राजकीय व शैक्षणिक अस्तित्व धोक्यात येईल.
त्यांनी ओबीसी नेत्यांना एकत्र राहून आरक्षण वाचवण्यासाठी लढा कायम ठेवण्याचे आवाहनही केले. राज्यभर ओबीसी समाजात निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर आजचा नागपूर मोर्चा निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
