Latest Posts

नवी मुंबई विमानतळाचे विस्तारीकरण : सीआरझेड मंजुरीसाठी अर्ज

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी मुंबई (Navimumbai): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आता विस्ताराचा नवा वेग लागणार आहे. अदानी समूहाच्या नवी मुंबई विमानतळ कंपनीने या विमानतळाची क्षमता वाढवण्यासाठी महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाकडे (MCZMA) सीआरझेड मंजुरीसाठी अर्ज केला आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर विमानतळाच्या विस्तारीकरणाला खऱ्या अर्थाने गती येईल, असे सूत्रांनी सांगितले.

विस्तारीकरणाच्या प्रक्रियेत किनारी भाग, मँग्रोव्ह जंगले, जैवविविधता, पूर आणि समुद्रपातळी वाढ यांसारख्या घटकांचा विचार होणार आहे. पर्यावरणीय संतुलन आणि स्थानिक हितसंबंध जपण्यासाठी सीआरझेड मंजुरी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

विस्तारीकरणासाठी सध्या उपलब्ध जमिनीव्यतिरिक्त किती जमीन लागणार आहे व त्यातील किती भाग सीआरझेडमध्ये येतो याचा सखोल अभ्यास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, अतिरिक्त टर्मिनल्स, रनवेचा विस्तार, आणि आधुनिक विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा वापर या कामांमध्ये होणार आहे. तसेच कार्गो केंद्राचे आधुनिकीकरण व विस्तार करून अधिक कार्यक्षम सेवा देण्यावरही भर दिला जाणार आहे. विस्तारीकरणासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.

सध्या विमानतळाची प्रवासी क्षमता वर्षाला ६ कोटी असून, ती ९ कोटींपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. कार्गो हँडलिंग क्षमतेतही १.५ दशलक्ष मेट्रिक टन वरून २.२५ दशलक्ष मेट्रिक टनपर्यंत वाढ करण्याचा मानस आहे.

विस्तारीकरणाचे काम पुढील ३-४ वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून, यामुळे स्थानिक आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे. महामुंबईतील हवाई क्षेत्रातील ताण कमी होईल व नवी मुंबई विमानतळ देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित होणार आहे. सीआरझेड मंजुरी मिळाल्यानंतर काम त्वरित सुरू होण्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss