विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / सातारा (Satara) : अल्पवयीन मुलीच्या खुनात अटक करण्यात आलेल्या संशयित राहुल यादवकडून आणखी एका खुनाचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोपीची कसून चौकशी सुरू असून, न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सातारा तालुक्यातील एका गावात शुक्रवारी (१० ऑक्टोबर) १३ वर्षीय शाळकरी मुलीचा निर्घृण खून झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाच्या धागेदोऱ्यावरून राहुल यादव (३४) या संशयिताला अटक केली. आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास करत पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला.
गेल्या नऊ महिन्यांपूर्वी त्याच परिसरात आणखी एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. त्या प्रकरणातही राहुल यादवची चौकशी झाली होती, मात्र त्यावेळी पुरावेअभावी त्याच्यावर कारवाई होऊ शकली नव्हती. तथापि, आता नव्या खुनानंतर त्याच्यावरील संशय पुन्हा गडद झाला आहे.
येत्या काही दिवसांत विहिरीत सापडलेल्या मुलीच्या मृत्यूचे गूढ उलगडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आरोपीला बोरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर करीत आहेत.
पोक्सो कलमांची वाढ –
राहुल यादव याच्यावर शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याने या प्रकरणात पोक्सो (बालकांच्या लैंगिक अपराधांपासून संरक्षण) कायद्यांतील कलमेही वाढविण्यात आली आहेत.
