विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मिरज (Miraj): महाराष्ट्र–कर्नाटक सीमाभागातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी मिरज–बेळगाव विशेष गाडी नियमित करून तिला पुन्हा पॅसेंजर दर्जा देण्याची आणि तिकीट दर कमी करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी दक्षिण-पश्चिम रेल्वेकडे केली आहे. दोन वर्षांपूर्वी पॅसेंजर गाडीला विशेष गाडीचा दर्जा देण्यात आल्याने प्रवाशांना दुप्पट दराने प्रवासाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
कोविड काळात ही पॅसेंजर गाडी बंद करण्यात आली होती. मात्र, कोरोनानंतरही ती पुन्हा सुरू न झाल्याने प्रवासी संघटनांनी वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी ही गाडी स्पेशल एक्सप्रेस म्हणून सुरू करण्यात आली. गाडी सर्व स्थानकांवर थांबत असूनही तिचे तिकीट दर एक्सप्रेस गाड्यांप्रमाणेच आहेत, त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक ओझे वाढले आहे.
पॅसेंजर दर्जा लागू झाल्यास मोठा दिलासा –
मिरज–बेळगाव विशेष गाडी मिरजेतून सकाळी ९.५० वाजता आणि सायंकाळी ५.३५ वाजता सुटते. मिरज ते उगार, कुडची आणि रायबाग दरम्यान सध्या तिकीट दर ४५ रुपये असून, पॅसेंजर दर्जा लागू झाल्यास तो केवळ १५ रुपये राहील. तसेच मिरज ते घटप्रभा, गोकाक रोड, पाछापूर, सुळेभावी व बेळगाव दरम्यान सध्याचा दर ७० रुपये असून, पॅसेंजर दर्जा लागू झाल्यास फक्त २५ रुपयांत बेळगावपर्यंत प्रवास करता येईल.
रेल्वे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे की, या गाडीला पुन्हा पॅसेंजर स्वरूप दिल्यास सीमाभागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. दररोज प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी व सामान्य प्रवासी यांचा प्रवास अधिक परवडणारा आणि सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा संघटनांनी व्यक्त केली आहे.
