Latest Posts

अल्पवयीन मुलीचे अपहरणाचा संशय : बल्लारपूरमध्ये खळबळ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur): शहरातील एका वॉर्डातून १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली असून, नातेवाईक तरुणाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने बल्लारपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती आपल्या पती व दोन मुलांसह बल्लारपूर शहरात राहते. तिची मोठी मुलगी (वय १२ वर्षे ६ महिने) ही घरीच राहत होती.

तक्रारीनुसार, मुलीचे तिच्या नातेवाईक तरुणासोबत मागील काही काळापासून बोलणे सुरू होते आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती कुटुंबाला मिळाली होती. गेल्या काही दिवसांपासून मुलीने त्या तरुणासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.

दरम्यान, २५ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास मुलीने आईकडे आईस्क्रीम घेण्यासाठी १० रुपये मागितले. पैसे घेतल्यानंतर ती घरातून बाहेर गेली, मात्र बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. जवळच्या दुकानात, नातेवाईकांकडे तसेच बसस्थानक व रेल्वे स्थानक परिसरात शोध घेतला, परंतु मुलगी कुठेही आढळून आली नाही.

याचवेळी संबंधित नातेवाईक तरुण हाही घरातून अनुपस्थित असल्याचे समोर आले असून, त्याचा मोबाईल फोनही बंद असल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे. त्यामुळे त्याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून, पोलिसांनी कलम १३७ (२) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करून मुलगी व संशयिताचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, सर्व शक्य त्या दिशेने तपास सुरू आहे.

Latest Posts

Don't Miss