विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): तळोधी (बा) वनपरिक्षेत्रातील सावरला गाव परिसरात दहशत माजविणाऱ्या आणि दोन नागरिकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला अखेर शनिवारी सायंकाळी वनविभागाने शिताफीने जेरबंद केले. सलग घडलेल्या हल्ल्यांमुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांसाठी ही कारवाई दिलासादायक ठरली आहे.
ही धडक कारवाई ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत रॅपिड रिस्पॉन्स टीमने (RRT) यशस्वीरित्या पार पाडली. ब्रह्मपुरी विभागाचे उपवनसंरक्षक कुमार स्वामी यांच्या देखरेखीखाली संपूर्ण मोहिम राबविण्यात आली.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रविकांत खोबरागडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाघाच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवत सापळा रचला. सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर. कन्नमवार यांचे सहकार्य लाभले. सायंकाळी सुमारे ६ वाजता नेमबाज अजय मराठे यांनी अचूक डार्ट मारत वाघाला बेशुद्ध केले.
दरम्यान, या वाघाने गेल्या पंधरवड्यात दोन जीव घेतले होते. २५ मार्च रोजी प्रमिला वाटघुरे (४५) यांचा सावर्ला परिसरात सरपण गोळा करताना बळी गेला, तर ५ एप्रिल रोजी मिन्थूर येथील शेतकरी महादेव कुबडे (५८) यांचा नागभीड वनपरिक्षेत्रात मृत्यू झाला होता. या घटनांनंतर वाघाची दहशत वाढली होती.
वनविभागाने त्याच्या हालचालींचा मागोवा घेत आधीच्या हल्ल्याच्या ठिकाणी आमिष ठेवले. नियोजनबद्ध सापळा आणि अचूक कारवाईमुळे वाघाला जेरबंद करण्यात यश आले. बेशुद्ध अवस्थेत वाघाला सुरक्षितरित्या गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्र येथे हलविण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे.
