Latest Posts

एलसीबी ची धडक कारवाई : अवैध जनावर वाहतुकीवर मोठा प्रहार, २७ गोवंशसह ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत २७ जनावरे व सुमारे ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिक्षक यांच्या आदेशानुसार शहरात विविध गुन्ह्यांविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत होती. त्यानुसार १२ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीनुसार पडोली ते घुग्घुस मार्गावरील खुटाळा परिसरातील दत्त मंदिराजवळ सापळा रचण्यात आला.

या कारवाईदरम्यान अशोक लेलँड कंपनीच्या ट्रकमधून अवैधरित्या जनावरांची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ट्रकसह २७ गोवंश (१७ गायी व १० बैल) ताब्यात घेतले. जप्त मुद्देमालामध्ये ट्रक किंमत २० लाख, मारुती स्विफ्ट डिझायर कार किँमत ५ लाख, जनावरे किँमत ५ लाख ४० हजार रुपये तसेच मोबाईल फोन असा एकूण ३१ लाख रुपयांचा समावेश आहे.

या प्रकरणी दानिश अब्दुल हमीद कुरेशी (वय २२), रा. व्याहाड खुर्द, समीर उर्फ सोहेल रा. गोवगाव जि आसिफाबाद तेलंगणा, सादिक कुरेशी रा. गडचांदूर, समीर खान रा. राजुरा व अजीम उर्फ अजू शेख रा. कागजनगर तेलंगणा यांच्याविरुद्ध पडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका आरोपीस अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, ताब्यात घेतलेली जनावरे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्यार फाउंडेशन, छोटा नागपूर येथे सुपूर्द करण्यात आली आहेत. पुढील तपास पडोली पोलीस करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा सतीश अवबरे, पोहवा रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा दीपक डोंगरे, पोहवा इम्रान खान, पोअं हिरालाल गुप्ता, पोअं किशोर वाकाटे, पोअं शशांक बदामवार, पोशि सुमित बरडे तसेच पोहवा कार्तिक बनके व पोअं राहुल पोंदे (सायबर शाखा) यांनी केले.

Latest Posts

Don't Miss