Latest Posts

राज्यात १०८ टक्के पाऊस : सप्टेंबरमध्ये दुपटीहून अधिक, ६० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे (Pune) : राज्यात यंदाच्या पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. १००४ मिलिमीटरच्या सरासरीपुढे प्रत्यक्ष १०९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून हे प्रमाण १०८ टक्के इतके आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने १०४ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता.

सप्टेंबर महिन्यात सरासरी १८० मिलिमीटर पावसाच्या तुलनेत तब्बल २९५ मिलिमीटर पाऊस झाला. हे प्रमाण १६४ टक्के असून गेल्या वर्षी याच महिन्यात ११६ टक्के पावसाची नोंद झाली होती. सप्टेंबरमधील या अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे ६० लाख हेक्टर क्षेत्रातील काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

महिन्यानिहाय विचार करता, जूनमध्ये २०७ मिलिमीटर (९९.८ टक्के), जुलैमध्ये २९०.८ मिलिमीटर (८७.९ टक्के), ऑगस्टमध्ये २९८.२ मिलिमीटर (१०४.३ टक्के) तर सप्टेंबरमध्ये २९५.३ मिलिमीटर (१६४.३ टक्के) पाऊस झाला आहे.

विभागनिहाय सर्वाधिक पाऊस संभाजीनगर विभागात ९४७.५ मिलिमीटर (१३९ टक्के) झाला आहे. त्याखालोखाल अमरावतीत ११५, नागपूर ११०, नाशिक ९८, कोकण ९६ तर सर्वांत कमी पुणे विभागात ८७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्हानिहाय पाहता बीड व धाराशिव जिल्ह्यात सरासरीच्या १६१ टक्के तर सर्वांत कमी कोल्हापूर जिल्ह्यात ७१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

महिन्यानुसार पावसाची आकडेवारी (मिलीमीटरमध्ये) –

जून : सरासरी २०८, प्रत्यक्ष २०७ (९९.८ टक्के), गतवर्षी १०७%
जुलै : सरासरी ३३१, प्रत्यक्ष २९०.८ (८७.९ टक्के), गतवर्षी १४६%
ऑगस्ट : सरासरी २८६, प्रत्यक्ष २९८.२ (१०४.३ टक्के), गतवर्षी ९१%
सप्टेंबर : सरासरी १८०, प्रत्यक्ष २९५ (१६४.३ टक्के), गतवर्षी ११६%

एकूण राज्य : सरासरी १००४ मिलिमीटर, प्रत्यक्ष १०९१ (१०८ टक्के), गतवर्षी ११६%.

Latest Posts

Don't Miss