Latest Posts

कुडेसावलीत बंद घर फोडून तांदळाच्या १३ कट्ट्यांची चोरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर (ballarpur) : तालुक्यातील कोठारी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुडेसावली येथे अज्ञात चोरट्याने बंद घर फोडून तांदळाचे १३ कट्टे व जुना लाकडी हातपंप असा एकूण १६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी कोठारी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादी मीरा ईश्वर चांदेकर (७५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या आपल्या नातवाच्या आजारपणामुळे चंद्रपूर येथे मुलाकडे राहण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी घराला कुलूप लावून गेल्या होत्या. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास शेतमजुरीसाठी गेलेल्या दशरथ महादेव गोंधळी यांनी घराचे ग्रील उघडे दिसल्याची माहिती दिली.

यानंतर मीरा चांदेकर गावात आल्या असता घराची पाहणी केली असता, पहिल्या खोलीत ठेवलेले १५ पैकी १३ कट्टे तांदूळ चोरीला गेल्याचे आढळून आले. प्रत्येक कट्ट्यात २५ किलो तांदूळ असून, प्रत्येकीची किंमत १ हजार २५० रुपये एवढी आहे. तसेच घरात ठेवलेला जुना लाकडी हातपंपही चोरीस गेला. मिळून १६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल लांबविण्यात आला आहे.

सदर घटना ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ते १५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३३१(४), ३३१(३), ३०५(अ) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार योगेश खरसान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश पोदाडी करीत आहेत.

Latest Posts

Don't Miss