– सर्वसामान्यांच्या हितासाठी सतत कार्यरत राहणे हाच माझा संकल्प – आमदार सुधीर मुनगंटीवार
– प्राजक्ता माळींच्या स्वागतासाठी बेंबाळमध्ये उसळली प्रचंड गर्दी
– सुधीरभाऊंसारखा नेता लाभणे म्हणजे भाग्य – अभिनेत्री प्राजक्ता माळी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): राज्यातील शेतकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता निस्वार्थ सेवा हेच माझं जीवनकार्य आहे, असा निर्धार राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
बेंबाळ येथील शारदा उत्सव समितीतर्फे आयोजित भव्य माँ अंबिका जागरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी हास्यजत्रा फेम सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, प्रवीण मोहूर्ले, संजय येनुरकर, वंदनाताई अगरकाटे, किशोर कापगते, तसेच बेंबाळ व जुनासुर्ला क्षेत्रातील महिला मंडळे आणि विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मुनगंटीवार म्हणाले, मी केवळ राजकारणी नाही तर जनतेचा सेवक आहे. समाजाच्या एकात्मतेचा संदेश देणाऱ्या नवरात्र उत्सवातून हम साथ साथ हैं हा भाव प्रत्येकाच्या मनात जागृत झाला पाहिजे. चेहऱ्यावरचे हास्य हेच खरे सौंदर्य असून, ते नेहमी टिकावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
यावेळी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाल्या, सुधीरभाऊ हे फक्त नेते नाहीत, ते जनतेचे मार्गदर्शक आहेत. विधानसभेत सामान्य माणसाचा आवाज ठामपणे मांडणारे, आणि जे बोलतात ते करून दाखवणारे नेतृत्व फार दुर्मिळ आहे. बेंबाळवासियांचे हे भाग्यच की त्यांना भाऊसारखा नेता लाभला.
या कार्यक्रमानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम, जागरण गोंधळ व सामाजिक एकात्मतेचा सण म्हणून नवरात्र उत्सवाने बेंबाळमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते.
