विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे (Pune): इंदापूर तालुक्यातील वनगळी गावाच्या हद्दीत उजनी जलाशयातून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करून साठवलेली अंदाजे २० हजार रुपये किमतीची ३ ते ४ ब्रास वाळू चोरून नेण्यात आली. या प्रकरणी दोघा जणांविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवराज राजाराम फलफले (रा. गलांडवाडी नं. २, ता. इंदापूर) व ज्ञानदेव खबाले (रा. भाटनिगाव, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे असून, गागरगाव येथील ग्राम महसूल अधिकारी हेमंत दिलीप भागवत यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आपल्या साथीदारांच्या मदतीने उजनी जलाशयातून वाळूचे बेकायदा उत्खनन करून, ती वाळू टिप्परमध्ये जेसीबीच्या सहाय्याने भरून नेत असल्याची माहिती महसूल विभागास मिळाली होती. त्यानुसार, ९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजून २० मिनिटांनी फिर्यादी अधिकाऱ्यांनी पोलिस पथकासमवेत घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्याचा सुगावा लागल्याने आरोपी घटनास्थळावरून टिप्परमध्ये भरलेली वाळू घेऊन पसार झाले.
या घटनेमुळे महसूल व पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास इंदापूर पोलिस करत आहेत.
