विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): तेलंगाना राज्यातील कत्तलीसाठी अवैधरित्या जनावर (गौवंश) वाहतूक करणाऱ्या चौघांविरुद्ध उमरी पोतदार पोलिसांनी मोठी कारवाई केली असून एकूण २५ जनावरांची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईत दोन पिकअप वाहनांसह सुमारे १८ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
११ ऑक्टोबर रोजी पहाटे उमरी पोतदार पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, दोन पिकअप वाहनांतून गोवंशांची कत्तलीसाठी वाहतूक केली जात आहे. त्यानुसार मौजा डोंगर हळदी रोडवर नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांनी दोन पिकअप वाहने थांबवून तपासणी केली असता त्यात २५ जनावरे कोंबून नेण्यात येत असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मंगेश शामराव चौधरी (वय २८) , रा. लक्कडकोट, राजेश गजानन घोगरे (वय २७) , रा. बेंबाळ, मोहम्मद अजीज अली (वय २४) , रा. वाकडी, मिर्झा अजीज बेग (वय २२) , रा. वाकडी यांना अटक केले आहे.
त्यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम व भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींकडून महिंद्रा बोलेरो पिकअप क्रं टीएस २० टी ४९६७ आणि एमएच ३४ बीझेड ८४२५, २५ जनावरे तसेच चार मोबाईल फोन असा एकूण १८ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर जनावरांची मेडिकल तपासणी पशुवैद्यक डॉक्टरांमार्फत करून त्यांचे प्रमाणपत्र प्राप्त करून सर्व जनावरे प्यार फाउंडेशन येथे सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. सदर कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन उमरी पोतदार चे ठाणेदार राहुल ठेंगणे यांच्या नेतृत्वात पोहवा सुभाष राऊत, पोअं. सतीश झाडे, विनोद चौधरी, राहुल शंखावार, सुरज बुजाडे, दिनेश देवाडे व गोपाल घुमडेवाड यांनी केले. पुढील तपास उमरी पोतदार पोलीस करत आहेत.
