विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे (Pune): राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल ४७ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. आतापर्यंत फक्त पाच जिल्ह्यांतील सुमारे ६ लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित ४१ लाख हेक्टरवरील पंचनाम्यांचे काम सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी सरकारी मदत दिवाळीनंतरच खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पाणी साचलेले असल्यामुळे पंचनामे होण्यास उशीर होत आहे. मात्र, दिवाळीपूर्वी मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खरीप हंगामात एकूण ७२ लाख हेक्टर शेतीचे नुकसान –
जून ते ऑगस्ट : २५.६८ लाख हेक्टर, सप्टेंबरमध्येच : ४७.०३ लाख हेक्टर, एकूण नुकसान क्षेत्र : ७२.७१ लाख हेक्टर
यासाठी फेब्रुवारी ते ऑगस्ट कालावधीतील नुकसानीसाठी २,५४२ कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे, जी सध्या वितरित होत आहे. सप्टेंबरमध्ये ३४ जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली असून, अजूनही २९ जिल्ह्यांचे अहवाल मिळालेले नाहीत.
अहवालानंतरच शासन निर्णय, मगच मदतीचे वाटप –
सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर महसूल विभागाकडून नवीन शासन निर्णय जाहीर केला जाईल. त्यात प्रत्यक्ष नुकसान आणि पात्र शेतकऱ्यांची नावे नमूद करून सरळ खात्यात मदत जमा केली जाणार आहे.
