विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारीत नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पदवीधरांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शुभम दांडेकर उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, पदवीधर मतदारसंघाच्या यादीत नाव नोंदणीकरीता जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 6 नोव्हेंबर २०२५ असून सर्व पदवीधरांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
असा आहे पदवीधर मतदारसंघ पुनरिक्षण कार्यक्रम –
१) मतदार नोंदणी अधिनियम, १९६० चे कलम ३१ (३) अन्वये जाहीर सुचना प्रसिध्द करण्याचा ३० सप्टेंबर २०२५, २) कलम ३१ (४) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी, ३) वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी २५ ऑक्टोबर २०२५ रोजी, ४) प्रकरणपरत्वे नमुना १८ द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम ६ नोव्हेंबर २०२५, ५) हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई २० नोव्हेंबर, ६) प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी २५ नोव्हेंबर रोजी, ७) दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी (मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम १२ अंतर्गत) २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५ पर्यंत, ८) दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे २५ डिसेंबर रोजी आणि ९) मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी ३० डिसेंबर २०२५ रोजी करण्यात येईल.
