Latest Posts

सोमवारपासून प्रकल्पातील बिटस्तरीय क्रीडा स्पर्धा

– आदिवासी विकास विभाग : अडीच हजारावर खेळाडू दखविणार कौशल्य
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटात सोमवार ६ नोव्हेंबर पासून तीन दिवसीय बिटस्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू होत आहेत. या क्रीडा संमेलनात प्रकल्पातील सुमारे २ हजार ५०० आदिवासी खेळाडू सहभागी होणार असून क्रीडा कौशल्याचे उत्तम प्रदर्शन करणार आहेत.

कारवाफा बिटातील क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सेमाना बायपास रोडवरील धनुर्विद्या मैदानावर सकाळी १० वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी गडचिरोली प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रफुल पोरेड्डीवार, अनिल सोमनकर, डॉ. प्रभू सादमवार, सुधाकर गौरकर, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उर्मिला सिडाम, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, प्रमिला दहागावकर, मुख्याध्यापिका वंदना महल्ले उपस्थित राहणार आहेत.

कारवाफा बिट स्पर्धेत गडचिरोली, कारवाफा, पोटेगाव, पेंढरी, गोडलवाही या शासकीय तर चांदाळा, गिरोला, गट्टा या अनुदानित अशा आठ आश्रमशाळांचा सहभाग राहणार आहे. गडचिरोली प्रकल्पातील पाच बिटातील २४ शासकीय तर १५ अनुदानित अशा एकूण ३९ आश्रमशाळेतील खेळाडू सहभाग घेणार आहेत. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी, खो- खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले या सांघिक खेळासह लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, धावणे या वैयक्तिक खेळाचे आयोजन केलेले आहे. क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत.

Latest Posts

Don't Miss