विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : वाहन चालवण्यासाठी देण्यात येणारा परवाना आरटीओमध्ये काढायचा असेल तर आतापर्यंत आरटीओमध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक होते. पण १ जूनपासून नव्या नियमानुसार ड्रायव्हिंग टेस्टसाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही.
रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेला नवा नियम १ जूनपासून लागू होणार आहे. सरकारी सेवेतून जुनी वाहने रद्द केली जाणार आहेत. तर अल्पवयीन चालकावरही कठोर कारवाई केली जाईल. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.
ड्रायव्हिंग टेस्टसंदर्भात नव्या नियमानुसार आता ड्रायव्हिंग टेस्ट ही ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतच देता येणार आहे. त्यासाठी ठराविक संस्थांना मान्यता दिली जाईल. ड्रायव्हिंग टेस्टशिवाय इतर काही नवे नियमही लागू होणार आहेत. यात जुनी सरकारी वाहने सेवेतून बाद केली जाणार आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने हा निर्णय घेतला गेला आहे.
अल्पवयीन चालक असल्यास कठोर कारवाई –
अल्पवयीन वाहनचालक असल्याचे गुन्हेही सातत्याने समोर येत असतात. त्याबाबतही सरकारने नवा नियम लागू केला आहे. त्यानुसार वाहनचालक अल्पवयीन असल्यास त्याला २५ हजारांचा दंड ठोठावला जाईल. तसंच त्याला २५ वर्षे वय पूर्ण होईपर्यंत वाहन चालवण्याचा परवाना दिला जाणार नाही. अल्पवयीनाला वाहन देणाऱ्या वाहनमालकाची नोंदणी रद्द होणार आहे.
ऑनलाइन कागदपत्रे सादर करता येणार –
ड्रॉयव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी काही बदल केले आहेत. वाहनाच्या प्रकारानुसार मोजकीच कागदपत्रे यासाठी लागणार आहेत. कागदपत्रे ऑनलाइन सादर करता येणार आहेत. आरटीओशी संबंधित परिवहनच्या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. कागदपत्रे सादर करण्यासाठी आणि ड्रायव्हिंग टेस्टसाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
