विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / कानपुर (Kanpur): उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथील मोहम्मदाबाद विमानतळावर उड्डाणाच्या प्रयत्नात असलेले एक खाजगी जेट विमान धावपट्टीवरून घसरून झुडुपात गेले. या विमानात चार प्रवासी आणि दोन वैमानिक असे एकूण सहा जण होते. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
ही घटना बुधवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. फर्रुखाबादचे जिल्हाधिकारी आशुतोष कुमार द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मोठ्या बिअर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भोपाळला जाण्यासाठी या खासगी विमानाने मोहम्मदाबाद विमानतळावरून उड्डाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, धावपट्टीवर विमानाने नियंत्रण गमावले आणि थेट झुडपांमध्ये घुसले.
मोठी दुर्घटना टळली –
विमान अपघातानंतर काही वेळासाठी धावपट्टीवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, तत्काळ अग्निशमन दल आणि पोलिस पथके घटनास्थळी दाखल झाल्यामुळे स्थिती नियंत्रणात आली. मोठी दुर्घटना टळल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, विमान अपघातानंतरच्या क्षणांचे दृश्य चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे.
अपघाताचे कारण शोधण्याचे काम सुरू –
या अपघाताचे खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमान तांत्रिक बिघाडामुळे घसरले की वैमानिकाकडून नियंत्रण सुटले, याची चौकशी विमानतळ प्रशासन व नागरी उड्डाण प्राधिकरण करत आहे.
