विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : घराच्या पायऱ्या धुतल्यानंतर पाणी शेजारील घराकडे गेल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना तालुक्यातील किन्ही येथे घडली. या प्रकरणात एका महिलेवर कथितरित्या कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला असून ती जखमी झाली आहे. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
प्राप्त माहितीनुसार, किन्ही येथे २५ मे रोजी सकाळी सुमारे १० ते १०.१५ वाजताच्या दरम्यान अर्चणा येवले या घराच्या पायऱ्या पाण्याने धुत होत्या. यावेळी पायऱ्यांवरील पाणी शेजारी राहणाऱ्या मोठ्या जाऊच्या घराकडे गेल्याने अर्चणा येवले व त्यांची जाऊ लता सुनिल येवले यांच्यात शाब्दिक वाद निर्माण झाला.
वाद सुरू असतानाच लता येवले यांचा मुलगा प्रज्वल सुनिल येवले हा हातात कुऱ्हाड घेऊन घटनास्थळी आला. आईसोबत भांडण का केले, असा जाब विचारत त्याने अर्चणा येवले यांच्याशी वाद घातला. त्यानंतर प्रज्वल याने अर्चणा येवले यांना जीवे मारण्याची धमकी देत हातातील कुऱ्हाडीने हल्ला केला. हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी हात पुढे केल्याने डाव्या हाताच्या करंगळीला गंभीर दुखापत झाली. तसेच डोक्यावरही मार लागून त्या जखमी झाल्या. याचवेळी लता येवले यांनी हाताबुक्क्यांनी मारहाण करून गळ्यावर नखांनी ओरखडले.
अर्चणा येवले यांच्या आरडाओरडीनंतर शेजारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मध्यस्थी करत वाद सोडविला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पती अनिल येवले घरी परतले. जखमी अवस्थेतील पत्नीला त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत बल्लारपूर पोलिसांनी प्रज्वल सुनिल येवले व लता सुनिल येवले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११५(२), ११८(१), ३५२, ३५१(३) व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम करीत आहेत.
कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे किन्ही परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
