विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur): सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने वीज दरवाढ जाहीर करत ग्राहकांना महागाईचा जोरदार झटका दिला आहे. ऑक्टोबरच्या वीज बिलात प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत इंधन समायोजन शुल्क लादण्यात आले असून, याचा फटका घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच शेती ग्राहकांनाही बसणार आहे.
महावितरणने १ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या सर्क्युलरद्वारे सप्टेंबर महिन्यातील वीज वापराबाबत अतिरिक्त शुल्क आकारण्याचे आदेश दिले आहेत. जुलै महिन्यात दर कपात केल्याचा दावा महावितरणने केला होता, मात्र लगेचच ऑगस्टपासून इंधन समायोजन शुल्क लादण्यात आले आणि आता सप्टेंबरसाठीही तीच प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
घरगुती ग्राहकांवर असा होणार भार –
वापर श्रेणी (युनिटमध्ये) प्रति युनिट शुल्क
बीपीएल ग्राहक १५ पैसे
१ – १०० युनिट ३५ पैसे
१०१ – ३०० युनिट ६५ पैसे
३०१ – ५०० युनिट ८५ पैसे
५०१ युनिटपेक्षा अधिक ९५ पैसे
उद्योजक, व्यापाऱ्यांना दुहेरी फटका –
महावितरणच्या या दरवाढीने उद्योगपती आणि व्यापाऱ्यांनाही जबर फटका बसणार आहे. नुकताच कुसुम घटक ब साठी सरकारने ९.९० पैसे प्रति युनिट कर लावला होता. आता एलटी औद्योगिक ग्राहकांना ४० ते ५० पैसे आणि एचटी औद्योगिक ग्राहकांना ५० पैसे प्रति युनिट इंधन समायोजन शुल्क आकारले जाणार आहे.
शेतकरी व ई-वाहनधारकही वंचित नाहीत –
शेतकऱ्यांना वीजदरात प्रति युनिट ४० पैसे अतिरिक्त द्यावे लागतील. इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनवरही ४५ पैसे अधिक भरावे लागणार आहेत. मेट्रो व मोनोरेलसाठीही तेवढ्याच दराने शुल्क वाढवले आहे.
महावितरणच्या म्हणण्यानुसार, वीज मागणी वाढल्याने ओपन मार्केटमधून महाग दराने वीज खरेदी करावी लागली, तसेच उत्पादन खर्च वाढल्याने ही दरवाढ आवश्यक ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, सणासुदीच्या काळात झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर ताण वाढणार हे निश्चित आहे.
