Latest Posts

वीज कर्मचारी संपात एसटी कर्मचाऱ्यांचेही रणसंग्रामाची तयारी : १३ ऑक्टोबरपासून मुंबईत धरणे

– १४ पासून नागपूरात बेमुदत आंदोलनाचा इशारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : राज्यातील वीज कर्मचारी खासगीकरणाविरोधात संपावर असतानाच आता एसटी कर्मचाऱ्यांनीही आंदोलनाचा झेंडा उभारला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती ने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी १३ ऑक्टोबरपासून आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही ताण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कृती समितीच्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबरपासून मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयासमोर रा. प. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी धरणे आंदोलन सुरू केले जाणार आहे. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास १४ ऑक्टोबरपासून नागपूर विभागीय कार्यालय, कार्यशाळा आणि सर्व आगारात बेमुदत धरणे आंदोलन सुरू होईल. हे आंदोलन टप्प्याटप्प्याने राज्यभरात राबविण्याची समितीची भूमिका आहे.

दरम्यान, नागपूर विभागातील संयुक्त कृती समितीच्या वतीने एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक विनोद चवरे आणि प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभने यांना निवेदन सादर करण्यात आले.

या वेळी शिष्टमंडळात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार, कामगार सेनेच्या राज्य महिला संघटिका यामिनी कोंगे, महाराष्ट्र मोटार फेडरेशनचे विनोदकुमार धाबर्डे, कास्टट्राईब संघटनेचे संग्राम जाधव, तसेच जेष्ठ नेते अरुण भागवत, मुरलीधर गुरपुडे, जगदीश पाटमासे, शशिकांत वानखेडे, अतुल निंबाळकर, गजानन दमकोंडवार यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

शिष्टमंडळाने एसटी महामंडळाने न्याय न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.

अजय हट्टेवार म्हणाले, शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर वारंवार आश्वासने दिली, पण एकही मागणी पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाईलाजाने आंदोलन करावे लागत आहे. शासनाने न्याय न दिल्यास आम्हाला तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. आता एसटी कर्मचाऱ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

राज्यातील वीज कर्मचारी संपामुळेच आधीच ताणलेली वीज व्यवस्था सलाईन वर आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्यास शासनासमोर दुहेरी संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Latest Posts

Don't Miss