विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / कोल्हापूर (Kolhapur): मिरजजवळील निलजी-बामणी रोडवरील पुलाजवळ ५०० रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपविण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणास पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून तब्बल ४२ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
अटकेतील तरुणाचे नाव सुप्रीत कडप्पा देसाई (२२, रा. इदरगुच्ची, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे आहे. त्याच्याकडून खऱ्या नोटांसारख्या भासणाऱ्या पाचशे रुपयांच्या ८४ बनावट नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या.
बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक नियमित गस्तीवर असताना ही कारवाई करण्यात आली. संशयित देसाई हा बनावट नोटा बाजारात खपविण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचून त्याला पकडले.
या प्रकरणी पोलिस कर्मचारी राजेंद्र हारगे यांनी गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, संशयितावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
