विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (wardha) : शासकीय संगणक टंकलेखन परीक्षा तसेच ऑनलाईन लघुलेखन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अमृत संस्थेच्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी अमृतच्यावतीने परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३० एप्रिल पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स लघुलेखन परीक्षा ऑनलाईन घेण्यात येते. जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल १० मार्च रोजी प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या अमृत लक्षित गटामध्ये खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील ब्राम्हण, बनिया, राजपुरोहित, कम्मा, कायस्थ, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, मारवाडी, ठाकूर, त्यागी, सेनुगुंधर, गुजराती, ऐयांगर, जाट, सिंधी, कानबी, राजपूत, कोमटी, हिंदू नेपाळी, भूमिहार इत्यादी जातीच्या विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे.
विद्यार्थ्यांनी अर्जासोबत उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा इडब्ल्यूएस प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, लक्षित गटाची जात नमुद असलेला शासकीय पुरावा, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे जानेवारी २०२६ चे प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक, रद्द केलेला धनादेश, आधार कार्ड, पॅनकार्ड जोबत जोडणे आवश्यक आहे.
यासाठी उमेदवारांनी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांची हार्ड कॉपी अमृतचे जिल्हा कार्यालय, प्रशासकीय भवन तळमजला येथे सादर करावी. अधिक माहितीसाठी ९११२२२७६३२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीचे (अमृत) जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश खराटे यांनी कळविले.
