विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur): खोकला व सर्दीसाठी दिलेल्या Coldrif कफ सिरपचे सेवन केल्यानंतर नागपूर येथील १८ महिन्यांच्या चिमुकलीचा शासकीय रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने आरोग्य यंत्रणेला हादरा दिला असून औषध प्रशासन आणि सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
प्रकृती बिघडल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करूनही संबंधित बालिकेचा जीव वाचवता आला नाही. या सिरपचे नाव मध्यप्रदेशातही चर्चेत असून तेथे याच औषधामुळे १६ बालकांचे बळी गेल्याचा आरोप आहे. नागपूरसह देशभरात ३६ बालकांवर अशाच प्रकृतीसंबंधी उपचार सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर Coldrif कफ सिरपसह NexTro-DS या कफ सिरपवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तसेच २ वर्षांखालील बालकांना कोणतीही कफ-सर्दीवरची औषधे देण्यास मनाई केली आहे. डॉक्टर आणि औषध कंपन्यांना क्लोरफेनिरामाइन मलेट आणि फिनाइलफ्रिन एचसीएल या रसायनांच्या वापरात विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लहान मुलांमधील सर्दी-खोकला सहसा काही दिवसांत आपोआप बरा होतो. परंतु कफ सिरपच्या अतिवापरामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. ही घटना औषध नियंत्रण व्यवस्थेतील त्रुटी स्पष्ट करणारी असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
