विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / भुवनेश्वर (Bhuvneshvar): बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात परिवर्तित झाला असून, तो उत्तर-वायव्य दिशेने वेगाने किनाऱ्याकडे सरकत आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ आज (२ ऑक्टोबर) रात्रीपर्यंत ओडिशा आणि शेजारील आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळ धडकेल तेव्हा ताशी ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज आहे. मात्र, ३ ऑक्टोबरपासून वाऱ्याचा वेग काहीसा कमी होऊन ताशी ४५ ते ५५ किलोमीटर इतका राहील. तरीदेखील या वादळाचे परिणाम अनेक दिवस जाणवणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
गोपाळपूर आणि पारादीप किनाऱ्यावर चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव राहील. तसेच ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेश या राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, ओडिशातील किनारी व दक्षिणेकडील भागांत बुधवारीपासूनच पावसाने जोर धरला असून, राज्यातील सर्व ३० जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी ओडिशा सरकारने संवेदनशील जिल्ह्यांमध्ये यंत्रसामग्री व कर्मचारी तैनात केले आहेत.
याच पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी ३ ऑक्टोबरपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
