Latest Posts

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष रुग्णांसाठी ठरतोय आधार

– केमोथेरपी व रेडिएशनसाठी मिळाली आर्थिक मदत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अनेक रुग्णांसाठी आधार ठरला आहे. जिल्ह्यात योजनेचा कक्ष सुरु झाल्यापासून हा निधी मिळविणे अधिक सोपे आणि कमी त्रासाचे झाले आहे. जिल्ह्यातील अनेक रुग्णांना या कक्षाचा लाभ झाला असून विविध आजारांवरील उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता  निधीने मोठा दिलासा दिला आहे. दुर्धर आजाराने ग्रस्त जिल्ह्यातील एका रुग्णाला कक्षाच्यावतीने आर्थिक सहाय्य मिळाल्याने केमोथेरपी व रेडिएशनसाठी मोठा हातभार लागला.

सर्वसामान्य गरीब कुटुंबातील रुग्ण दुर्धर आजारांवर उपचार किंवा शस्त्रक्रिया करू शकत नाही, असे आजार झाल्यास त्यांना खरा प्रश्न पडतो, यासाठी येणारा खर्च करायचा कसा. अशा रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मोठा आधार देणारा ठरला आहे. अनेक रुग्णांना या कक्षाने वैद्यकीय मदतीचा हात दिला.

अल्लीपूर येथील रहिवासी शुभांगी राजेंद्र कलोडे यांना केमोथेरीपी आणि रेडीएशन या आजारावरील उपचारासाठी सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. त्यांना दुर्धर आजारवरील उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून आर्थिक मदत मिळते, याबाबत माहिती मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या सहायता कक्षाशी संपर्क साधून मदतीसाठी अर्ज सादर केला. कक्षाच्यावतीने त्यांचा अर्ज तपासून मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडे अर्ज केला आणि उपचारासाठी ५० हजार रुपये प्राप्त झाले. या रक्कमेमुळे मोठा आधार मिळाला. माझ्या पत्नीच्या उपचारासाठी आर्थिक मदत दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांचे आभार मानतो, अशा शब्दात शुभांगी कलोडे यांचे पती राजेंद्र कलोडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रियेच्या मदतीसाठी रुग्ण जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षास संपर्क साधू शकतात किंवा https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जासोबत आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड, वैद्यकीय अहवाल, खर्चाचे अंदाजपत्रक जोडणे आवश्यक असते. मदतीच्या लाभासाठी रुग्ण राज्याचा निवासी व त्याचे उत्पन्न एक लाख ६० हजारापेक्षा कमी असावे.

Latest Posts

Don't Miss