विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandpur): बल्लारशाह–गोंदिया रेल्वे मार्गावर आज पुन्हा एकदा वन्यजीवाचा बळी गेला आहे. पहाटेच्या सुमारास चंद्रपूरकडे येणाऱ्या रेल्वेच्या धडकेत एका मादी सांबराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वनविकास महामंडळाच्या मामला वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४१० मध्ये घडली.
यंदाच्या वर्षात या रेल्वेमार्गावर आतापर्यंत एक वाघ, एक बिबट, तीन अस्वल, चार सांबर आणि एक रानगवा अशा दहा वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये १९ जानेवारी रोजी वाघ, २५ मे रोजी अस्वल, २८ जून रोजी सांबर व गर्भातील पिल्लू, ५ जुलै रोजी रानगवा, ३० ऑगस्ट रोजी दोन अस्वले, ८ सप्टेंबर रोजी सांबर, १७ सप्टेंबर रोजी बिबट, आणि आज १२ ऑक्टोबर रोजी मादी सांबराचा समावेश आहे.
बल्लारशाह–गोंदिया हा रेल्वे मार्ग चंद्रपूर, ब्रम्हपुरी, नागझिरा आणि गोंदिया या वनक्षेत्रातून जात असल्याने वन्यजीवांच्या नैसर्गिक भ्रमणमार्गाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. एका जंगलातून दुसऱ्या जंगलात स्थलांतर करताना रेल्वे रुळ ओलांडताना अनेक वन्यजीवांचा जीव जात आहे.
पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव संरक्षण कार्यकर्त्यांच्या मते, रेल्वे प्रशासन आणि वनविभागाने वेळीच उपशमन उपाययोजना – जसे की अंडरपास, ओव्हरपास किंवा कंपाऊंड वॉल – राबविल्या असत्या, तर अनेक वन्यजीवांचे प्राण वाचू शकले असते. मात्र, अद्यापही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
हा रेल्वेमार्ग तेलंगणातील कावल व्याघ्र प्रकल्प, तसेच महाराष्ट्रातील कन्हाळगाव अभयारण्य, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, उमरेड-कऱ्हांडला व नवेगाव–नागझिरा अभयारण्य या महत्त्वाच्या व्याघ्र प्रकल्पांना जोडणाऱ्या वन्यजीवांच्या भ्रमणमार्गातून जातो. त्यामुळे हा प्रदेश जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो.
घटनास्थळी हॅबिटॅट कंझर्वेशन सोसायटी चे अध्यक्ष दिनेश खाटे, अमित देशमुख, नाजिश अली, अभिषेक गजभे, तसेच वनविकास महामंडळाच्या मामला वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहायक खडगी, स्वामी आणि वनमजूर उपस्थित होते.
या घटनेनंतर वनप्रेमींनी पुन्हा एकदा मागणी केली आहे की, बल्लारशाह–गोंदिया रेल्वेमार्गावर तत्काळ वन्यजीव संरक्षक उपाययोजना राबविण्यात याव्यात, अन्यथा अशा दुर्दैवी घटना सुरूच राहतील.
