विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : बल्लारशाह – गोंदिया रेल्वेमार्गावर लोहारा येथील वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक १० मध्ये रेल्वेच्या धडकेत सांबराच्या पिल्ल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना सोमवारी, ८ सप्टेंबर रोजी पहाटे १ वाजून ३९ मिनिटांनी घडली. चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीने पिल्ल्याला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या रेल्वे मार्गावर वन्यजीवांच्या मृत्यूच्या घटना सातत्याने घडत आहेत. यावर्षी २५ मे रोजी अस्वलाचा, २८ जून रोजी सांबर व तिच्या गर्भातील पिल्लाचा, ५ जुलै रोजी रानगव्याचा, ३० ऑगस्ट रोजी दोन अस्वलांच्या पिल्लांचा तर आता ८ सप्टेंबर रोजी सांबराच्या पिल्लाचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण ७ वन्यप्राण्यांचा मृत्यू या मार्गावर झालेला आहे.
हा रेल्वेमार्ग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या लगत असून वाघांच्या भ्रमण मार्गालाही छेदतो. तसेच कावल अभयारण्य व उमरेड-करहांडला अभयारण्याच्या परिसराजवळून ही जातो. याच मार्गाचा विस्तार पुढे मध्य प्रदेशातील बालाघाट-नैनपूर विभागातून झालेला असून तेथे वन्यजीवांसाठी अंडरपासेस, ओव्हरपासेस अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र महाराष्ट्रात अशी कोणतीही उपाययोजना न झाल्याने वन्यजीवांचे प्राण जात आहेत.
आणखी किती वन्यजीव बळी गेल्यावर रेल्वे प्रशासन जागे होणार? विकासाच्या नावाखाली आपण विनाशाकडे तर चाललो नाही ना, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, असे मत हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे यांनी घटनास्थळी व्यक्त केले.
या वेळी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे दिनेश खाटे, अमित देशमुख, अंकित बाकडे, अभिषेक गजभिये, राहील अली तसेच वनविकास महामंडळाचे वनक्षेत्र सहाय्यक खडगी उपस्थित होते.
