विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur): डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार यांची प्रमुख उपस्थिती होती. बल्लारपूर शहरात दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरी केली जाते. यंदाही मोठ्या प्रमाणावर मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याने पोलीस प्रशासनाने पूर्वतयारी म्हणून ही बैठक घेतली.
बैठकीदरम्यान नागरिकांनी आणि आयोजकांनी मिरवणुका शिस्तबद्ध पद्धतीने काढाव्यात, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. विशेषतः डीजेच्या आवाजाबाबत सूचना देण्यात आल्या. डीजेचा आवाज मर्यादित ठेवावा, ध्वनीप्रदूषणाचे नियम पाळावेत, अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला.
या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे घनश्याम मुलचंदानी, नगरसेवक सिक्की यादव, भाजपच्या वरिष्ठ नेत्या रेणुका दुधे, संध्या मिश्रा, पत्रकार समीर केने, आंबेडकरी कार्यकर्ते राजू झोडे व पवन भगत, जिल्हा शांतता समितीचे सदस्य काशीनाथ सिंह, नासीर बक्ष उर्फ भुरू, माजी नगरसेविका शांता बहूरीया, ज्योती गहलोत, रेखा देशकर, ॲड. प्रियंका चव्हाण, वनिता वेले, वैशाली तिरपुडे, अमर धोंगडे, शशिकांत निरंजने, प्रदीप झामरे, अजय चव्हाण, अशोक भावे, संजय डुंबेरे, प्रा. राजेश ब्राम्हणे, लोकचंद भोयर, पत्रकार रमेश निषाद, पत्रकार नारद प्रसाद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सदर बैठकीचे नियोजन पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्र वन्नकर, मपोअं प्रिया कांबळे व पोअं रुपेश टोंगे यांनी केले. बैठकीच्या शेवटी सर्वांनी एकमताने शांतता, सलोखा आणि सामाजिक ऐक्य राखत आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.
