विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष पेट्रोलिंग सुरू असताना तलवार बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमाला बल्लारपूर पोलिसांनी अटक केली. आरोपी राकेश जयराज डेकले (वय ३३), रा. दादाभाई नौरोजी वार्ड, बल्लारपूर असे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दादाभाई नौरोजी वार्डातील संदेश किराणा स्टोअर्सजवळील गल्लीत एक व्यक्ती तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या इसमाने आपले नाव राकेश जयराज डेकले (वय ३३),, रा. दादाभाई नौरोजी वार्ड, बल्लारपूर असे सांगितले. त्याच्याकडे तलवार असल्याबाबत विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर आरोपीच्या घरासमोरील जागेची झडती घेण्यात आली.
झडतीदरम्यान घरासमोरील संडास-बाथरूमजवळ एक लोखंडी तलवार आढळून आली. सदर तलवारीची एकूण लांबी सुमारे ८९ सेंमी असून पात्याची लांबी ६५ सेंमी असल्याचे निदर्शनास आले.
सदर तलवार जप्त करण्यात आली असून आरोपीविरुद्ध आर्म्स अॅक्ट कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहेत.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष पंडीत, विकास जुमनाके, प्रविण निकोडे, नापोअं सचिन अल्लेवार, पोअं शरदचंद्र कारुश, खंडेराव माणे यांनी केले.
पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात काही प्रमाणात दिलासा व्यक्त करण्यात येत आहे.
