Latest Posts

८ ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ऐतिहासिक लोकार्पण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी मुंबई (navimumbai): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ८ ऑक्टोबर रोजी होणार असून, हा दिवस महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. ही घटना विकसित भारताच्या उत्तुंग झेपेचे प्रतीक ठरणार असून, महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला नवे पंख लाभतील, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

देशातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड प्रकल्प –
११६० हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात आलेला हा विमानतळ देशातील सर्वांत मोठ्या ग्रीनफिल्ड प्रकल्पांपैकी एक ठरला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांची सेवा देण्याची क्षमता आहे, तर अंतिम टप्प्यात ही क्षमता ९० दशलक्षांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

रोजगार व संधींचा महाकेंद्र –
या प्रकल्पामुळे तीन वर्षांत १५ ते १८ हजार रोजगार निर्माण होतील, तर पुढील दोन दशकांत हा आकडा एक लाखांवर जाण्याची शक्यता आहे. विमानतळामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात नव्या संधींचा मोठा दरवाजा खुलेल, असे सिंघल यांनी स्पष्ट केले.

आधुनिक तंत्रज्ञानाची झलक –
या विमानतळाची रचना आणि सुविधा आधुनिक भारताचे दर्शन घडवतील. साडेतीन दशलक्ष टनांहून अधिक मालवाहतुकीची क्षमता, दोन समांतर धावपट्ट्या, कमलपुष्पावर आधारित अद्वितीय वास्तुरचना, स्वयंचलित पीपल मुव्हर प्रणाली आणि भूमिगत नेटवर्कद्वारे जोडलेले चार टर्मिनल्स यामुळे हे विमानतळ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रतीक ठरेल.

डिसेंबरपासून उड्डाण सेवा सुरू –
८ ऑक्टोबर रोजी उद्घाटनानंतर विमानतळाचा ताबा सीआयएसएफकडे (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) सुपूर्द केला जाईल. त्यानंतर साधारण दीड ते दोन महिन्यांनी, म्हणजे डिसेंबरपासून प्रवासी व मालवाहतूक सेवा सुरू होणार असल्याचेही सिंघल यांनी सांगितले.

Latest Posts

Don't Miss