Latest Posts

भंडाऱ्यात ३२ कोटींच्या बेवारस ठेवी : दावा न केलेल्या रकमेवर शासनाची जनजागृती मोहीम सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : देशभरातील विविध बँकांमध्ये तब्बल १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी शिल्लक आहेत. या ठेवींपैकी महाराष्ट्र राज्यातच ५ हजार ८६६ कोटी रुपये अजूनही कुणीही दावा न केल्याने त्या रकमा बेवारस ठेवी म्हणून पडून आहेत.

यात वैयक्तिक खात्यांच्या ४ हजार ६१२ कोटी, संस्थात्मक खात्यांच्या १ हजार ०८२ कोटी, तसेच सरकारी योजनांतील १७२ कोटी रुपयांच्या ठेवी चा समावेश आहे. या ठेवींचा परतावा मिळवून देण्यासाठी शासनाने विशेष जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, १० वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यांमधील ठेवी ‘ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी’मध्ये हस्तांतरित केल्या जातात. तथापि, या ठेवीवर मूळ खातेदार किंवा त्यांचे वारसदार दावा करण्याचा संपूर्ण हक्क राखतात, असे आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

भंडारा जिल्ह्यातील विविध बँकांमधील १ लाख ५० हजार ४१२ खात्यांमध्ये सुमारे ३२ कोटी रुपयांच्या ठेवी अद्याप दावा न केलेल्या स्थितीत आहेत. या ठेवींचा परतावा खातेदारांना मिळावा यासाठी १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.

ही मोहीम जिल्हा अग्रणी बँक आणि बँक ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने, तसेच सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे खातेदारांना त्यांच्या निष्क्रिय खात्यांचा तपशील पडताळून पाहण्याचे, तसेच आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँकेत दावा सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बँकांच्या या उपक्रमामुळे नागरिकांना त्यांच्या हरवलेल्या ठेवींचा परतावा मिळण्याचा मार्ग सुकर होणार असून, बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता आणि विश्वासार्हतेची वाढ होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Latest Posts

Don't Miss