विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई(Mumbai) : नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि उद्रेकामुळे राज्यातील शंभराहून अधिक पर्यटक तिथे अडकले आहेत. ठाणे, पुणे, मुंबई, लातूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटकांचा यात समावेश असून, बीड जिल्ह्यातील काही पर्यटक रस्ता मार्गे खासगी वाहनाने परतण्यासाठी प्रयत्नरत आहेत. हे पर्यटक गोरखपूरपर्यंत पोहोचले असल्याची माहिती आहे. सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील असून, नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने मदतीसाठी +९७७-९८०८६०२८८१ आणि +९७७-९८१०३२६१३४ हे नेपाळमधील हेल्पलाइन क्रमांक तर, +९१-९३२१५८७१४३ आणि +९१-८६५७११२३३३ हे राज्यातील क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. या क्रमांकांवर व्हॉट्सअॅप कॉलद्वारेही संपर्क साधता येणार आहे.
पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असून, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय व महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून भारतीय दूतावासाशी सतत संपर्क ठेवला जात आहे. राज्यातील पर्यटकांना सर्वतोपरी मदत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नेपाळमधील अस्थिरतेचा मोठा फटका पर्यटनावर बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ५०० हून अधिक पर्यटकांनी आपला नियोजित नेपाळ दौरा रद्द केला आहे. नेपाळमध्ये दरवर्षी हजारो पर्यटक पर्यटनासाठी जातात. मात्र हिंसाचारानंतर टूरिस्ट कंपन्यांकडे बुकिंग रद्द करण्याच्या विनंत्या वाढल्या आहेत. विमान कंपन्यांनी तिकीट रद्द न करण्याचा पवित्रा घेतल्याने ट्रॅव्हल्स व्यवसायिकांची अडचण वाढली आहे.
पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला असून, यामुळे कोल्हापूरातील पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे जिल्हा टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे यांनी सांगितले.
