विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची (Korchi) : आदिवासी बहुल छत्तीसगड सिमेलगत असलेल्या कोरची तालुका मुख्यालयापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गुटेकसा येथील आदिवासी कन्या मनीषा मडावी हिने मलेशिया येथे विदेशात जाऊन भारताचे नेतृत्व केले व खो-खो स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करून संपूर्ण देशाचे नाव लौकिक केले आहे.
मनीषा हिचे जन्म गुटेकसा येथे झाले असून तिचे चौथीपर्यंतचे शिक्षण कोरची तालुक्यात झाले व नंतर पाचव्या वर्गात श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा नागपूर या शाळेत प्रवेश घेतला व वयाच्या अवघ्या अकरावा वर्षापासून मनीषा हिने खो-खो या खेळाचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. तिची जिद्द व चिकाटी ओळखून अश्फाक शेख व पराग बनसोडे यांनी तिला मार्गदर्शन केले व स्वतःची मेहनत व मार्गदर्शनाच्या जोरावर मनीषाने मलेशिया येथे १२ ते १५ ऑक्टोंबर दरम्यान झालेल्या कुमार गटाच्या आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदकाची कामगिरी बजावली. मनीषा ही खेळाप्रमाणे अभ्यासातही हुशार असून दहावीच्या परीक्षेत मनीषाने ८० टक्के गुण प्राप्त केले आहे.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मनीषा हिचे स्वागत व सत्कार समारंभ गुटेकसा येथे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात कोरची येथील बस स्थानकापासून स्वागत रॅली काढून करण्यात आली. यानंतर मनीषा च्या स्वगावी गुटेकसा येथे स्वागत समारंभाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था विदर्भ नागपूर या संस्थेचे प्रवासी कार्यकर्ते प्रशांत बोपर्डीकर, कोरची पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, माजी पं. स. सदस्य सदाराम नुरुटी, सौ. शांतीबाई हिडामी पोलीस पाटील गुटेकसा, महादेव बनसोड, आसाराम शेंडे, सामाजिक कार्यकर्ते आशिष अग्रवाल, राष्ट्रपाल नखाते, जितेंद्र सहारे, रवींद्र भोयर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश कोसारे व प्रास्ताविक रमेश देशमुख यांनी केले. सदर कार्यक्रमाला गुटेकसा येथील सर्व जनता आणि एकलव्य एकल विद्यालय तालुका कोरची येथील सर्व पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
