Latest Posts

वन्यप्राण्यांची बेकायदेशीर शिकार करणारे दोघे अटकेत : स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरने गुप्त माहितीच्या आधारे राबवलेल्या कारवाईत ब्रम्हपुरी परिसरात वन्यप्राण्यांची बेकायदेशीर शिकार करून वाहतूक करणारे दोन इसमास गजाआड करण्यात आले. आरोपींकडून तीन मृत जंगली डुक्कर, एक भरमार बंदूक, जिवंत दारुगोळा आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई ब्रम्हपुरी–आरमोरी रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ करण्यात आली. कुंदनसिंग शेरसिंग भुराणी (३१), विजयसिंग सुरतसिंग भुराणी (२१) दोघेही रा. पेठ वार्ड, ब्रम्हपुरी आरोपींची नावे आहेत.

दोघे आरोपी मोपेडवरून जंगली डुकरांचे मृत अवयव चोरून नेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडले. त्यांच्या ताब्यातील वन्यप्राणी, शस्त्र व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून, त्यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ आणि भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, पोलीस अंमलदार गणेश भोयर, अजित शेंडे, नितेश महात्मे, प्रदीप मडावी यांनी केले.

Latest Posts

Don't Miss