Latest Posts

वंदे भारत एक्स्प्रेसला ४ डबे वाढणार : पुणे – मुंबई प्रवाशांना दिलासा

विदर्भ  न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था/ पुणे (Pune) : पुणे, मुंबई आणि सोलापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. सोलापूर – मुंबई मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस गाडीच्या डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. येत्या २९ ऑगस्टपासून या गाडीला चार डबे वाढविण्यात येणार असून, एकूण डब्यांची संख्या १६ वरून २० वर जाणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे विशेषत –

पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसला नेहमीच मोठी गर्दी असते. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी तर प्रवाशांना वेटिंगलाही सामोरे जावे लागते. त्यामुळे डबे वाढवावेत, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात होती.

वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्र. २२२२५/२२२२६)ही सोलापूर – मुंबई – सोलापूर दरम्यान धावणारी महत्त्वाची गाडी असून, तिच्यात चेअरकार व इकॉनॉमी क्लासला १०० टक्क्यांहून अधिक प्रतिसाद मिळत आहे. पुणे हे या मार्गावरील प्रमुख स्थानक असल्याने, येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात.

रेल्वे प्रशासनाने मुंबई – नांदेड व मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेससाठी एकत्रित रेक (रोलिंग स्टॉक) वापरण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे डबे वाढविणे शक्य झाले आहे. या वाढीमुळे वंदे भारतमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ३१२ ने वाढणार आहे.

जानेवारी २०२५ पर्यंत एकूण ४ लाख ६९ हजार ६०९ प्रवाशांनीया मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास केला आहे, ही बाब या गाडीच्या लोकप्रियतेची साक्ष देणारी ठरते.

या निर्णयामुळे पुणेकरांसह सोलापूर आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Latest Posts

Don't Miss