विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : प्रगती नगर, चिमूर येथील एका बंद घरात झालेल्या घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांत उघडकीस आणला असून, फक्त ७ दिवसांत चोरीस गेलेले ३८ तोळे सोन्याचे दागिने मूळ फिर्यादीकडे सुपूर्द करण्यात आले.
कल्पना मुरलीधर गोन्नाडे (४६ वर्ष) यांनी ११ जुलै रोजी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्या तक्रारीनुसार, ६ ते ११ जुलै २०२५ दरम्यान, त्या कुटुंबियांसह बाहेरगावी असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व ३८ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकांनी १३ जुलै रोजी आरोपीला अटक केली आणि चोरीस गेलेले संपूर्ण सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
तपास पूर्ण झाल्यानंतर, १९ जुलै २०२५ रोजी, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संपूर्ण मुद्देमाल १९ जुलै २०२५ रोजी पंचासमक्ष ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या हस्ते चिमुर पोलीसांच्या उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चिमुर येथे शपथकर्ता फिर्यादी कल्पना मुर्लीधर गोन्नाडे ४६ वर्ष रा. प्रगती नगर चिमुर यांना परत करण्यात आले आहे.
संपुर्ण मुद्देमाल परत मिळाल्याचा आनंदाने फिर्यादीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि पोलीसांचे चेहऱ्यावर कर्तव्यपूर्तीचा समाधान झाल्याने परिसरातील नागरिकांनी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
पोलीसांच्या जलद आणि परिणामकारक कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास दृढ झाला आहे. पोलीस अधीक्षक व त्यांच्या टीमचे समाजातून जोरदार कौतुक केले जात आहे. अशा कार्यप्रणालीमुळे पोलिसांबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक दृढ होतो, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
