विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (bhandara) : तुमसर तालुक्यातील चिखला गावालगतच्या शेतशिवारात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. रानडुकराच्या मागे लागलेला वाघ आणि तो रानडुकर, दोघांचाही विनातोंडी विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सकाळी सुमारास ७ वाजताच्या दरम्यान ही बाब समोर आली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी रात्री वाघ आपल्या शिकारीसाठी रानडुकराच्या मागे लागला होता. शिकार करत असताना धावताना अंदाज चुकून दोघेही जवळील शेतातील विहिरीत पडले. ही विहीर चिखला येथील कवनलाल बाबुलाल धुर्वे यांच्या मालकीची असून, गट क्रमांक १२२ मध्ये स्थित आहे. विशेष म्हणजे या विहिरीला तोंड (सुरक्षा कठडा) नव्हता, जे या दुर्घटनेचे मुख्य कारण मानले जात आहे.
सकाळी दिसला मृत्यूचा दृश्य –
शुक्रवारी सकाळी शेतकरी आपल्या शेतात गेले असता त्यांनी विहिरीत वाघ आणि रानडुकराचे मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहिले. त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच गोबरवाहीचे ठाणेदार शरद शेवाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शेंडे, राउंड अधिकारी अशोक मेश्राम घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही प्राण्यांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले.
चिचोली डेपो येथे शवविच्छेदन व अंत्यसंस्कार-
मृत वाघ आणि रानडुकराचे शवविच्छेदन चिचोली डेपो येथे करण्यात आले. यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बारापात्रे, डॉ. पाटील, डॉ. तुलावी यांनी तपासणी केली. त्यानंतर उपवनसंरक्षक गवई आणि सहाय्यक उपवनसंरक्षक रितेश भोंगाडे यांच्या उपस्थितीत दोन्ही प्राण्यांचे अग्निदाह करण्यात आले.
शेतकऱ्यावर होणार कारवाई? –
ही दुर्घटना ज्या विहिरीमुळे घडली, ती विहीर विनातोंडी असून तिच्याभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. त्यामुळे या प्रकाराला अपघात मानले जात असले, तरी वन्यजीव सुरक्षा नियमांनुसार अशा विहिरींवर तोंड बांधणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यावर वन विभाग कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
जंगल परिसरात सतर्कता गरजेची –
ही घटना वन्यजीवांच्या वाढत्या चळवळीचे द्योतक आहे. जंगलालगत असलेल्या शेतशिवारातील विहिरींना तोंड बांधणे, सुरक्षेची योग्य उपाययोजना करणे ही आता काळाची गरज बनली आहे, अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
