– १ हजार सी- ६० कमांडो, २५ बीडीडीएस टीम व ५०० विशेष पोलीस अधिकारी / नवनियुक्त पोलीस जवान व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने २४ तासात उभारले नवीन पोलीस स्टेशन
– पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक नीलोत्पल व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले नवीन पोलीस स्टेशनचे अनावरण
– ग्रामस्थांनी माओवाद्यांच्या खोट्या कथनाने प्रभावित होवून त्यांच्या भरकटलेल्या क्रांतीला बळी पडू नये व नवीन पोलीस स्टेशनची स्थापना या भागाचे सर्वागीण विकासामध्ये महत्वाची भूमीका बजावेल : पोलीस अधीक्षक नीलोत्पल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा, दुर्गम-अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांचा विकास साधावा व माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा, यासाठी गडचिरोली पोलीस दलाने काल २० नोव्हेंबर २०२३ रोजी उपविभाग हेडरी अंतर्गत वांगेतुरी या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली.
सदर पोलीस स्टेशनची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण १ हजार ५०० मनुष्यबळ, १० जेसीबी, १० ट्रेलर, ०४ पोकलेन, ४५ ट्रक इत्यादीच्या सहायाने अवघ्या एका दिवसांत पोस्ट उभारणी करण्यात आली. पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, २० पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लँट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल इत्यादींची उभारणी करण्यात आली. यासोबतच पोस्ट सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे ०४ अधिकारी व ६३ अंमलदार, एसआरपीएफचे ०१ अधिकारी व ४२ अंमलदार तसेच सीआरपीएफचे १९१ बटालियनचे ०१ असिस्टंट कमांडन्ट व ०१ जी कंपणी तसेच ०१ अधिकाऱ्यासह १ यंग प्लाटुन तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोस्ट उभारणी कार्यक्रमादरम्यान वांगेतुरी येथील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना सलवार सुट, नव्वारी साडी, पुरुषांना धोतर, लोअर पॅन्ट, चप्पल, ब्लॅकेट, चादर, टि-शर्ट, मुलींना सायकल, नोटबुक, फ्रॉक, कंपास, चॉकेट्स, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. अतीदुर्गम भागात नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीमुळे तेथील नागरीकांनी संतोष व्यक्त केला आहे.
माओवादी आणि माओवादी आघाडीच्या संघटनेकडुन निषेधास बसण्यासाठी तेथील ग्रामस्थांना भाग पाडल्यामुळे नवीन पोलीस स्टेशनच्या स्थापनेकरीता विशेष अभियान पथकातील जवान व पोमकें गट्टा (जां.) पोलीस पार्टी जवान हे तोडगड्डा मार्गाने वांगेतुरी येथे जात असतांना व तोडगट्टा ते रेकलमेट्टा रोडदरम्यान नाकाबंदी करीत असतांना तेथील सुमारे १०० ते १५० आंदोलनकर्त्यांनी त्यांना पुढे जाण्यापासून थांबविले. यानंतर काही आंदोलनकर्त्यांनी पोलीस दलातील जवानांना धक्काबुक्की केली. परंतु पोलीसांनी कोणत्याही प्रकारच्या बळाचा वापर न करता तेथील सुमारे २० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे व त्यांचेवर कायदेशिर कारवाई करण्यात आली. तसेच तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली असता, त्यांनी आम्हाला या भागात रस्ते व मोबाईल टॉवर हवे आहेत असे सांगितले. तेथील सर्व ग्रामस्थांना गडचिरोली पोलीस दलाकडुन संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन स्वत:हून मागे घेतले. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी उपस्थितांना संबोधितांना सांगितले की, गडचिरोली पोलीस दल नेहमीच गडचिरोलीच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहीला आहे. त्याचाच एक परिपाक म्हणून आज या नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आलेली आहे. तरी गडचिरोली पोलीस दल या माध्यमातून गडचिरोलीच्या जनतेच्या मदतीसाठी सदैव तत्पर असेल.
सदर नवीन पोलीस स्टेशन उभारणीच्या कार्यक्रमास गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील, गडचिरोली जिल्ह्राचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखीव बल १९१ बटालियनचे कमान्डंट सत्यप्रकाश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी बापुराव दडस व पोस्टे वांगेतुरीचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सपोनि. महेश विधाते हे उपस्थित होते.
