विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (mumbai) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाच्या टक्केवारीत १.४९ टक्क्यांची घसरण झाली आहे.
या वर्षी परीक्षेसाठी विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम व आयटीआय या शाखांसाठी एकूण १४ लाख २७ हजार ८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थी परीक्षेला बसले, आणि १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
निकाल कमी होण्यामागे कारणे –
यंदा निकालात घट होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे शिक्षण मंडळाने कॉपी विरोधात राबवलेली कडक मोहिम असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षीच्या चाचणी प्रक्रियेवर अधिक काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात आले. तरीही बारावी परीक्षेतील १५४ विषयांपैकी ३७ विषयांमध्ये शंभर टक्के निकाल लागले आहेत.
विभागनिहाय निकालाचे चित्र –
राज्यातील ९ विभागांपैकी कोकण विभाग पुन्हा एकदा आघाडीवर असून ९६.७४ टक्के निकालासह सर्वोच्च स्थानावर आहे. लातूर विभागात सर्वात कमी, ८९.४६ टक्के निकाल लागला आहे.
विभाग टक्केवारी
कोकण ९६.७४%
कोल्हापूर ९३.६४%
मुंबई ९२.९३%
छत्रपती संभाजीनगर ९२.२४%
अमरावती ९१.४३%
पुणे ९१.३२%
नागपूर ९१.३२%
नाशिक ९१.३१%
लातूर ८९.४६%
विद्यार्थ्यांची एकूण माहिती –
राज्यातून एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख १० हजार ३४८ मुले, ६ लाख ९४ हजार ६५२ मुली, आणि ३७ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश होता. एकूण १० हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून ही नोंदणी झाली होती. परीक्षेसाठी ३ हजार ३७३ मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.
निकाल पाहण्यासाठी लिंक –
विद्यार्थी व पालक खालील लिंकवर निकाल पाहू शकतात:
– https://results.digilocker.gov.in
– https://mahahsscboard.in
– http://hscresult.mkcl.org
महाविद्यालयांकरिता निकाल :
– https://mahahsscboard.in
