विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात उष्मालाट सुरू आहे. उष्मलाटेच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी व करावयाच्या उपाययोजनेबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
नागपूर जिल्ह्यातील तापमानामध्ये बरीच वाढ झालेली असून उष्मालाटेमुळे कामगार, शेतकरी, भिकारीवर्ग, रस्त्यावरील विक्रेते, वयोवृद्ध, बालके, स्त्रिया आदी संवेदनशील गटांवर प्रतिकूल परिणाम होऊन त्याचा आरोग्यास धोका निर्माण होण्याची शकतात नाकारता येत नाही. या गटातील व्यक्तींनी विशेषतः बांधकामांचे कार्य करणाऱ्या कामगारांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी – शक्यतो १२ ते ४ दुपारच्या वेळेत काम बंद ठेवून बाहेर उन्हामध्ये जाण्याचे टाळावे. कामाच्या वेळा सकाळी व सायंकाळी ठेवाव्या. उन्हामध्ये घराबाहेर जात असताना किंवा काम करत असताना डोके व कान झाकण्याकरिता पांढरा रंगाचा सुती कपडा किंवा दुप्पट्याचा वापर करावा. पाणी भरपूर प्यावे, तसेच दुपारच्या वेळेस ओआरएस, ताक, निंबूपाणी, नारळपाणी, ऊसाचा रस, इत्यादी द्रव्यांचे सेवन करावे. कामाच्या ठिकाणी संबंधीत ठेकेदारांनी, संस्थेने कामगारांकरीता मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी, सावलीकरिता शेड उपलब्ध करून द्यावे व त्यांना दुपारच्या सत्रात विश्रांतीकरिता आवश्यक नियोजन करावे.
कार्यालयामध्ये अभ्यागतांसाठी पिण्याचे पाणी व सावलीकरीता शेडची व्यवस्था करावी.प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखे उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्या. पातळ, सेल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे. थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापरावे. उन्हात बाहेर जाताना शूज किवा चप्पल घालाव्यात.
रेडिओ, टीव्ही वर प्रसारित होणाऱ्या उष्णतेच्या लाटेबाबत बचाव उपायावर लक्ष द्यावे आणि स्थानिक हवामान बातम्यांसाठी वर्तमानपत्र वाचावीत. भारतीय हवामान विभागाच्या https://mausam.imd.gov.in/ या संकेतस्थळावर हवामानाविषयी अद्ययावत माहिती घेत रहावे. हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवा, थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटा रोखण्यासाठी दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवावे, घराबाहेरील कामे दिवसाच्या सकाळ आणि संध्याकाळ वेळेपर्यंत मर्यादित करावी. दिवसाच्या थंड वेळांमध्ये बाहेरील कामांचे नियोजन करावे.
संवेदनशील किंवा जास्त जोखीम असलेल्या लोकांसाठी –
कोणालाही उष्णतेचा ताण आणि उष्णतेशी संबंधित आजाराचा त्रास होऊ शकतो. काही लोकांना इतरांपेक्षा जास्त धोका असतो त्यांच्याकडे अतिरिक्त लक्ष द्यावे. लहान अर्भक आणि लहान मुले घराबाहेर काम करणारे लोक, गर्भवती महिला, ज्यांना मानसिक आजारपण असलेले व्यक्ती, शारीरिकदृष्ट्या आजारी, विशेषतः हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी जास्त श्रम टाळावेत आणि भरपूर पाणी प्यावे.
