– महाकृषी ऊर्जा अभियान योजना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : महाकृषी ऊर्जा अभियान योजनेंतर्गत सौरपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतक-यांनी अर्जातील त्रुटीची पुर्तता तात्काळ करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाकृषी ऊर्जा अभियान योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये आजपर्यंत १ हजार १२३ अर्ज महाऊर्जा कुसूम पोर्टलवर प्राप्त झालेले आहे. या अर्जापैकी ३१६ लाभार्थी शेतक-यांनी सौरपंप योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच १ हजार १२३ लाभार्थी शेतकऱ्यांपैकी २७ शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आलेली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित यादीमध्ये आहेत. या सर्व लाभार्थ्यांना कुसूम पोर्टलवरुन त्यांच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठविण्यात आलेले आहे. तसेच महाऊर्जाच्या जिल्हा कार्यालयाकडून अशा सर्व लाभार्थ्यांना कागदपत्रांची त्रुटी पुर्ण करण्यासाठी भ्रमणध्वनीवर कळविण्यात आलेले आहे. मात्र अद्यापपर्यंत काही लाभार्थ्यांकडून त्रुटीची पुर्तता करण्यात आलेली नाही.
वर्धा तालुक्यातील ६ शेतकऱ्यांचे अर्ज, कारंजा ३, आष्टी १, आर्वी ३, सेलू १, हिंगणघाट ८ व समुद्रपूर तालुक्यातील ५ शेतकऱ्यांचे असे एकुण २७ शेतकऱ्यांचे अर्ज अपुर्ण आहेत. त्यामुळे संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी महाऊर्जा जिल्हा कार्यालयाच्या dowardha@mahaurja.com या ई-मेलवर संपर्क करुन आपल्या अर्जामध्ये असलेल्या कागदपत्रांच्या त्रुटीबाबत व अर्ज अपुर्ण असलेल्या शेतकऱ्यांना अर्ज पुर्ण करण्याकरीता काही अडचणी असल्यास विचारणा करावी तसेच प्राप्त मार्गदर्शनानुसार त्रुटीची पुर्तता करुन घ्यावी, असे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या जिल्हा व्यवस्थापकांनी कळविले आहे.
