Latest Posts

स्लो ओव्हर रेटचा फटका : लॉर्ड्स कसोटी जिंकूनही इंग्लंडवर आयसीसीचा दंड आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुण कपात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / लंडन (Londan) : लॉर्ड्समध्ये झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर विजय मिळवला असला, तरीही हा आनंद फार काळ टिकला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) इंग्लंड संघावर स्लो ओव्हर रेटसाठी कारवाई करत मॅच फीचा दंड आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे (WTC) गुण कपात केल्याने संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे.

लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने दोन षटके निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात अपयश आल्याने ICC ने संपूर्ण संघावर मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावला आहे. यासोबतच संघाच्या खात्यातून २ डब्ल्यूटीसी गुण कपात करण्यात आले. परिणामी, इंग्लंडच्या विजयी टक्केवारीत घट होऊन ती ६६.६७ वरून थेट ६० टक्क्यांवर आली आहे. यामुळे गुणतालिकेत इंग्लंडला दुसऱ्या स्थानावरून घसरून तिसऱ्या स्थानी जावे लागले आहे.

या कारवाईची घोषणा आयसीसी एलिट पॅनेलचे मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी केली. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, ठरावीक वेळेत ओव्हर न पूर्ण करणाऱ्या संघाच्या खेळाडूंना प्रत्येक षटकासाठी मॅच फीच्या ५ टक्के दंड आकारला जातो. इंग्लंडने दोन षटके उशिरा टाकल्याने त्यांना एकूण १० टक्के दंड ठोठावण्यात आला.

इंग्लंड संघाचे कर्णधार बेन स्टोक्स यांनी ही चूक मान्य करत दंड स्वीकारला आहे, त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता भासली नाही. फील्ड अंपायर पॉल रीफेल आणि शराफुद्दौला इब्ने शाहिद, तिसरे अंपायर अहसान रझा आणि चौथे अंपायर ग्रॅहम लॉईड यांनी इंग्लंडविरुद्धचा अहवाल सादर केला होता.

भारताविरुद्ध ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवलेल्या इंग्लंडला या दंडामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विजय मिळवूनही इंग्लंडच्या टक्केवारीत घट आणि स्थान घसरणीमुळे संघाच्या आगामी डावपेचांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

Latest Posts

Don't Miss