Latest Posts

निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प विचार पूर्वक द्यावा : अशोक दगडे

– निवृत्ती वेतन योजनेबद्दल माहिती देण्यासाठी कार्यशाळा द्यावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : शासकीय सेवेत १ नोव्हेंबर २०२५ नंतर नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी शासनाने एनपीएस युपीएस आणि सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या विकल्प निवडीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. विकल्प सादर करण्याचा अंतिम दिनांक ३१ मार्च २०२५ असून कर्मचाऱ्यांनी सर्व योजनांचा तुलनात्मक अभ्यास करुन निवृत्ती वेतन योजनेचा विचार पूर्वक विकल्प सादर करावा, असे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांनी केले.

कर्मचारी व अधिकाऱ्यांनी विकल्प देतांना कोणती निवृत्ती वेतन योजना निवडायची यासाठी सविस्तर माहिती देण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात कार्यशाळा आयोजित केली आहे, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी शुभदा चिंचोळकर मातोश्री अकाऊंट केअर कन्सल्टन्सीचे संचालक प्रकाश वानखेडे मध्यवर्ती सहकारी संघटनेचे वर्धा जिल्हा शाखेचे अध्यक्ष दिपक धाबर्डे, कार्याध्यक्ष प्रशांत भोयर, कोषाध्यक्ष मनोज धोटे व सरचिटणीस पंकज आगलावे आदी उपस्थित होते.

दगडे पुढे म्हणाले की, निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प देतांना शासनाने विकल्प दिलेल्या योजनांचा अभ्यास करावा व आपल्याला लाभदायक असलेली योजना स्विकारावी असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी एनपीएस युपीएस आणि सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेबाबत माहिती दिली.

सेवा निवृत्त अधिकारी प्रकाश वानखेडे यांनी निवृत्ती योजनेबाबत उपस्थितांना सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली व उपस्थितांच्या शंकाचे निराकरण केले. प्रास्ताविक दिपक धाबर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन राखी जयस्वाल यांनी केले तर उपस्थितांचे आभार पंकज आगलावे यांनी मानले.

Latest Posts

Don't Miss