विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : शासनाने पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग बहार २०२५ करिता राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत ३० जून २०२५ अशी होती. पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत भाग घेण्यासाठी आधार क्रमांक पडताळणी आवश्यक असते.
परंतु २७ जून २०२५ पासून आधार क्रमांक पडताळणीमध्ये काही तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांना योजनेत भाग घेण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे हा कालावधी वाढविण्यासाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
प्रस्तावास केंद्र शासनाने अनुमती दिली असून आता शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने २ जुलै २०२५ च्या दिलेल्या निर्देशानुसार योजनेत संत्रा, मोसंबी व लिंबू पिकाकरिता विशेष बाब म्हणून मुदतवाढ देण्यात आली असून अंतिम मुदत ०६ जुलै २०२५ अशी राहणार आहे. तसेच आधार क्रमांक पडताळणी व्यवस्थित सुरू आहे.
केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे नागपूर जिल्हयातील जास्तीत जास्त संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेत भाग घेता येईल. www.pmfby.gov.in पोर्टलवर स्वतः शेतकऱ्यांनी तसेच बँक विमा कंपनी नियुक्ती केलेले एजंट, क्रॉप इन्शुरन्स ॲप, व सामूहिक सेवा केंद्र (CSC) यांचे मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी केले आहे.
