Latest Posts

पूर्व विदर्भात पावसाचा इशारा तीव्र : चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडाऱ्यात रेड अलर्ट; नागपूर, वर्ध्याला ऑरेंज अलर्ट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : पूर्व विदर्भातील हवामानात मोठा बदल होण्याची चिन्हं स्पष्ट झाली आहेत. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत येत्या २४ तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली असून, हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. त्याचबरोबर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, आपत्कालीन स्थितीत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विदर्भात पावसाचा जोर कायम –
रेड अलर्ट जाहीर झालेल्या जिल्ह्यांमध्ये बुधवारपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारीही श्रावणसरींनी दिवसभर वातावरण ओलेचिंब केले.गोंदिया जिल्ह्यात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५१ मि.मी. पावसाची नोंद झाली.
चंद्रपूरमध्ये याच कालावधीत ४७ मि.मी. पाऊस पडला.
गडचिरोली जिल्ह्यातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती.
नागपूरमध्ये मात्र पावसाने अद्याप जोर धरलेला नसला तरी, सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून कधीही पावसाला सुरुवात होऊ शकते.

चंद्रपूर व भंडाऱ्यात शैक्षणिक संस्थांना सुटी –
भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने शुक्रवार, २५ जुलै रोजी सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच खासगी शिकवणी वर्गांना सुटी जाहीर केली आहे.

प्रशासन सतर्क, नागरिकांना सावधगिरीचे आवाहन –
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काही भागांत अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागांत राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.
जिल्हा प्रशासनांकडून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, जलमय किंवा पूरप्रवण भागांमध्ये बचाव पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

महत्वाच्या सूचना –
अनावश्यक प्रवास टाळावा
पावसाळी नाल्यांच्या परिसरात जाऊ नये
विद्युत उपकरणांचा वापर काळजीपूर्वक करावा
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे
आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा

हवामानाचा अंदाज आणि अलर्टच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील नागरिकांनी सजग राहणे अत्यावश्यक असून, प्रशासनानेही आपत्ती व्यवस्थापनासाठी पूर्ण तयारी केली आहे.

Latest Posts

Don't Miss